पुण्यात आजही इंडिगोची ४२ विमाने रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल

Foto
पुणे : इंडिगो एअरलाईन्सच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचा देशातील हवाई प्रवासावर गंभीर परिणाम होत असून, इतर विमान कंपन्यांनी तिकीट दरात मोठी वाढ केली आहे. अनेक लोकप्रिय मार्गावरील भाडे प्रचंड वाढले असून, एअर इंडियाच्या पुणेमुंबई उड्डाणाचे तिकीट दर तब्बल एक लाख रुपयांवर पोहोचले आहेत. तसेच नागपूरमुंबई मार्गावरील विमानासाठी देखील ३० हजार रुपयांहून अधिक भाडे आकारले जात असल्याचे दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून इंडिगोचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून पुणे विमानतळावर त्याची सर्वाधिक झळ बसली आहे. शुक्रवारी इंडिगोची ४६ उड्डाणे रद्द करण्यात आली होती. यात दिल्ली, नागपूर, चेन्नई, कोची, बंगळुरू, रांची तसेच महाराष्ट्रातील २३ उड्डाणांचा समावेश आहे. बाहेरील राज्यांतून पुण्यात येणारी २३ उड्डाणे देखील रद्द करण्यात आली होती. काही उड्डाणांचे वेळापत्रक दिवसभरात अनेकदा बदलण्यात आले, त्यामुळे प्रवासी पूर्णपणे गोंधळून गेल्याचे पाहायला मिळाले.

तिकीट दरात मोठी उसळी; अनेक मार्गांवर ३० हजारांपेक्षा जास्त भाडे

विविध प्रवास संकेतस्थळांचा आढावा घेतला असता, इंडिगोव्यतिरिक्त इतर विमान कंपन्यांनी पुणेमुंबई, मुंबईनागपूर आणि नागपूरपुणे मार्गावरील तिकीट दर ३० हजार रुपयांपेक्षा जास्त लावल्याचे स्पष्ट झाले. प्रवाशांची वाढलेली मागणी आणि उपलब्ध उड्डाणांची कमतरता यामुळे या कंपन्यांनी दर वाढवले आहेत.

मुंबईनागपूर विमानभाडे तब्बल ३९ हजार रुपयांवर

नागपूर विमानतळावरही परिस्थिती गंभीर आहे. इंडिगोची सात ते आठ उड्डाणे दररोज रद्द होत असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. इतर एअरलाईन्सने याचा फायदा घेत भाड्यात प्रचंड वाढ केली आहे. एका प्रवाशाच्या म्हणण्यानुसार मुंबईनागपूर प्रवासासाठी ३९ हजार रुपये भाडे आकारले जात आहे. वैमानिकांची कमतरता, चेक-इन प्रणालीतील तांत्रिक अडचणी आणि संचालनातील विविध त्रुटींमुळे इंडिगोची सेवा कोलमडली आहे.

१००० हून अधिक फ्लाईट रद्द; प्रवाशांची प्रचंड गैरसोय

इंडिगोने शुक्रवारी देशभरातील जवळपास ५०० उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर सलग चौथ्या दिवशी देशातील विमानतळांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दिल्ली विमानतळावरून ५ डिसेंबर २०२५ रोजी उड्डाण करणारी सर्व देशांतर्गत विमाने मध्यरात्रीपर्यंत (११:५९ वाजेपर्यंत) रद्द केल्याचे दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने एक्सवर जाहीर केले. यामुळे हजारो प्रवासी ताटकळले, काहींना रात्रभर विमानतळावरच थांबावे लागले. तर इंडिगोनं गेल्या चार दिवसांमध्ये १००० हून अधिक फ्लाईट रद्द केल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.